×

राष्ट्रमाता जिजाऊ

Published On :    12 Jan 2021  By : MN Staff
शेयर करा:


‘इतिहासा तू वळूनी पाहशी पाठीमागे जरा झुकवूनी मस्तक करशील,त्यांना मानाचा मुजरा’

‘इतिहासा तू वळूनी पाहशी पाठीमागे जरा
झुकवूनी मस्तक करशील,त्यांना मानाचा मुजरा’
भारतीय इतिहासातील सुवर्णपान, स्वराज्यजननी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा युगप्रवर्तक मॉं जिजाऊ साहेबांचे चरीत्र हे सर्वांना नेहमीच स्फूर्तिदायी आहे. काही समाजशास्त्रज्ञांच्या मते एका विचारधारेनुसार पित्याच्या सहवासाशिवाय शिक्षण व संस्कारांच्या बाबतीत मुलाचा सर्वांगीण विकास होवू शकत नाही. पण या विचारधारेला छेद देत जिजाऊंनी शिवाजी महाराजासारखे बहुआयामी व्यक्तीमत्व घडवले.यातच त्यांचे श्रेष्ठपण सामावले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे साहस व त्यागाची कहाणीच आहे.


लखूजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊ या लहानपणापासूनच खूप धीट व अभ्यासू होत्या. त्यांनी मराठी, फार्सी, संस्कृत, ऊर्दू, हिंदी, तेलगू या भाषा अवगत केल्या होत्या. आज २१ व्या शतकात आम्ही दोन-तीन भाषेतच अडकून आहोत. यानिमित्ताने प्रत्येक स्त्रीने विचार करण्याची गरज आहे की वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करुन जगाच्या कानाकोपर्‍यातील ज्ञानाचे उत्खनन करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत का? हा प्रश्न स्वतः साठी अनिवार्य आहे. बाहुलीसोबत खेळायच्या वयापासूनच त्या तलवारीसोबत खेळत होत्या. तो काळ म्हणजे आदिलशाही व निजामशाहीतील सत्तासंघर्षाने होरपळणारा होता. आया-बहिणींची अब्रु वेशीला टांगली जात होती. मुलींचा लिलाव होत होता.शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने घाम गाळून पिकवलेले धान्य बादशहाचे सैन्य लुबाडून नेत असत. हे सर्व बघून जिजाऊंचे हृदय पिळवटून यायचे प्रचंड चीड यायची.


जिजाऊंचा विवाह वयाच्या दहाव्या वर्षी १६०५ मध्ये शहाजीराजांसोबत वेरुळ येथे मोठ्या थाटामाटात झाला. हा विवाह म्हणजे दोन तेजस्वी जीव एकत्र येण्याचा सोहळाच होता. शहाजीराजांच्या अंगी प्रचंड शौर्य असूनही वेगवेगळ्या शाह्यांमधील वैर, शहाजीराजांना मिळणारी दुय्यम स्थान जिजाऊ उघड्या डोळ्यांनी बघत होत्या. सन १६२१ साली जिजाऊंना पहिले पुत्ररत्न झाले. पराक्रमी दिराच्या नावावरुन त्याचे नाव ‘संभाजी’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर चार अपत्ये झाली पण ती जगली नाहीत. विजापूर दरबारातील हत्तीप्रकरण, भातवडीची लढाई, पुढे लखूजी राजेंची झालेली हत्या, पुणे जहागिरीची लूट व जाळपोळ अशा धावपळीत सन १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर या मातेने तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव ‘शिवाजी’असे ठेवण्यात आले. आईला ध्येय कळले तरच आई आपल्या मूलाकडून पूर्ण करुन घेवू शकते. स्वराज्याचे स्वप्न शहाजीराजे व जिजाऊंनी शिवरायांच्या जन्मापूर्वीच पाहिले होते. माझा मुलगा कुणाची गुलामगिरी करणार नाही, मनसबदारी करणार नाही, स्वतःचे   राज्य निर्माण करेल अशा मानसिकतेत त्यांनी शिवरायांना घडवले. त्यामुळेच बालवयापासून त्या शिवरायांना ‘राजे’ म्हणूनच संबोधत. स्वराज्यजननीच्या  संस्कारांतूनच नव्या युगाचा प्रारंभ झाला.


जिजाऊ १६४२ साली निवडक सैनिकांसह पुणे जहागिरीत आल्या. तेव्हा आदिलशहाच्या सरदाराने संपूर्ण पुणे उध्वस्त केले होते. त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवून त्याठिकाणी १२ फूटी पहार रोवून, फाटकी चप्पल, तुटका झाडू, फाटके वस्त्र टांगून ठेवले होते. ते एका अर्थाने सर्व ‘अशुभ’ प्रतिके होती. जो कोणी या ठिकाणी वास्तव्य करील तो निर्वंश होईल ही भीती गावकर्‍यांच्या मनात रुतून बसली होती. अशा परिस्थितीत जिजाऊ धैर्याने पुढे सरसावल्या. अंधश्रद्धेचे जोखड फेकून दिले. शिवरायांकडून त्या भूमीवर नांगर फिरवला. स्वतः त्या ठिकाणी वास्तव्यास आल्या. लोकांच्या मनातील भीती कृतीतून दूर केली. त्यांना वास्तव्य करण्यासाठी, शेती करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. जिजाऊंचा हा निर्णय केवढा क्रांतिकारी, विज्ञाननिष्ठ होता! आपल्या समाजात आजही लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. मानवी वस्ती नसल्यामुळे  तिथे जंगली श्‍वापदांचा सूळसुळाट झाला होता. उभ्या पिकांची नासधूस ही श्वापदे करत होती. जिजाऊंनी हा प्रश्न मोठ्या युक्तीने सोडवला. जो कोणी या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचे कडे बक्षिस म्हणून दिले जाईल अशी दवंडी देण्यास सांगितले. यामुळे पिकांवर उच्छाद मांडणार्‍या जनावरांचा बंदोबस्त तर झालाच पण स्वराज्य उभारणीसाठी तरुण, तडाफदार, शूर मावळ्यांची फळी ऊभी राहिली. जिजाऊ परिसरातील लोकांचे तंटे सोडवणे, त्यांना मदत करणे यांसारख्या जबाबदार्‍या पार पाडत असतांना आदर्श न्याय-निवाड्याचे प्रात्यक्षिकच बाल शिवबा बघत होते.


तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर डागडूजी प्रसंगी सुवर्णमुद्रा व सुवर्णमुर्ती सापडल्या.सुवर्णमुद्रा या खर्च करता येत होत्या पण या सुवर्णमूर्तींच काय करायचं? शिवरायांनी हा प्रश्न मातोश्रींना विचारला तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, देव-देवतांच्या मूर्ती देव्हार्‍यात ठेवून स्वराज्यासाठी काही उपयोग होणार नाही. कर्तव्य हाच आपला धर्म आहे. मानवता- माणुसकी आपण जपली पाहिजे. ऐवढं केल तरी देव-देवतांची पूजा करणं आवश्यक नाही. सुवर्णमूर्ती वितळवून तो पैसा स्वराज्य उभारणीसाठी लावा. रयतेच्या कामी लावा. हा केवढा बुद्धिनिष्ठ युगपरिवर्तक निर्णय होता आणि तोही सतराव्या शतकातला. स्वराज्यात स्त्रियांना खूप मानाचे स्थान होते. ते केवळ जिजाऊंच्या संस्कारामुळेच. रांझा गावच्या पाटलाने गरीब शेतकर्‍याच्या मुलीची अब्रु लुटली, तेव्हा जिजाऊ कठोर शासन करायला पुढे सरसावल्या. त्यांच्या आदेशानुसार त्याचे हात, पाय कलम करण्यात आले. बांगड्या घातलेले कमकुवत हात प्रसंगी जिजाऊंच्या रुपाने कठोर न्यायदानाचे काम करु शकते.त्यामुळे स्त्रीही अबला नसून प्रसंगी महिषासूरमर्दीनीचे रुप घेवून समाजव्यवस्थेचे घातक रूप पालथवू शकते हे न्यायदानाच्या माध्यमातून सिद्ध झाले. स्त्रियांकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन वृद्धिंगत झाला. आपल्या लेकरासाठी कासावीस  होवून कठीण बुरुज उतरणार्‍या हिरकणीचे कौतुक साडीचोळी देवून करण्यात आले. तसेच बुरुजाला ‘हिरकणी’ बुरुज नाव देण्याची प्रेरणा त्यांचीच. यानिमित्ताने चार भिंतीत बंदिस्त असलेल्या स्त्रियांच्या शौर्याला मुक्त विचारपीठ उपलब्ध करुन त्याला संस्कारीतपणे मानवंदना देण्यात आली. स्त्रियांना जणू स्वतःच्या आस्तित्वाचे पैलू उलगडण्याची संधी मिळाली.


जिजाऊ कोमल मनाच्या  पण वेळ येताच कणखर होवून युद्धासाठी सज्ज होत. त्यांच्या माहेरी व सासरीही सदैव अनुभवाला येणारे युद्धाचे वातावरण लाभल्यामुळे उच्च कोटीची राजनितीची जाण त्यांच्यात होती. त्या शस्त्रास्त्र चालवण्यात पारंगत होत्या. त्यासाठी लागणारे पराकोटीचे मनोधैर्यही त्यांच्यात होते. त्यांनी प्रसंगी घेतलेल्या निर्णयांवरुन हे स्पष्ट होते. शिवाजीराजे पन्हाळगडावर अडकून पडले असतांना गिरीदुर्गाच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः उचलली. किल्लेदार, सर्व अधिकारी,सैनिक यांना मार्गदर्शन करीत. शत्रुने किल्ल्याला वेढा दिला तर किल्ला दिर्घकाळ लढवता यावा यासाठी आवश्यक धान्यसाठा करुन ठेवावा लागतो. अशा कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात ठासून भरली होती. पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवरायांना सोडवून आणण्यासाठी त्या स्वतः सज्ज झाल्या होत्या. त्यांना प्रत्यक्ष जाण्याची गरज भासली नाही पण आशा प्रसंगी त्यांच्यातील धाडसी वृत्ती, शौर्य गाजवण्याची धमक लक्षात येते.


 छत्रपती शिवरायांनी अफजलखानचा वध केला तेव्हा त्याचे शिर जिजाऊंकडे पाठवले तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, खान स्वराज्याचा दुश्मन होता. तो मेला त्याबरोबर त्याच्याशी असलेलं वैर संपलं. गेलेल्याबद्दल वैरभाव बाळगणं ही माणुसकी नाही. खान सरदार होता.त्याचे इतमानाने दफन करा. त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोन किती विशाल होता. बजाजी नाईक निंबाळकरांचा धर्मत्याग व धर्मस्वीकार प्रकरणात जिजाऊंनी सनातनी विचारसरणीच्या लोकांचा रोष पत्करला. त्यांचे अंतःकरण सागरासारखे विशाल होते. त्यांनी स्वधर्मात घेवून धार्मिक सहिष्णुता दाखवली.त्यांचा हा पुरोगामी निर्णय काळाच्या पुढे बघण्याची क्षमता दर्शवतो.
शिवरायांबरोबर त्या कायम ठामपणे उभ्या राहिल्या.वेळोवेळी उचित निर्णय दिले. त्यामुळे स्वराज्य उभे राहू शकले. त्या नेटाने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळत. सईबाईंच्या अकाली निधनाने बाळ संभाजीराजांची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली. दूधआई निवडतांना निकोप विचारांच्या निवडीची परीक्षा त्यांच्यातील भावनाशीलता दर्शवते. शहाजीराजांच्या मृत्युनंतर सती न जाता स्वतःच्या स्वराज्यधर्माचा विचार पुढे तेजोमय करण्यासाठी स्वतःचे उरलेले आयुष्य व्यतित केले. शहाजीराजांचा स्वराज्यबांधणीचा विचार शेवटच्या श्वासापर्यंत तेवत ठेवला. शिवरायांवर करण्यात आलेल्या संस्कारांच्या कोंदनामुळेच हजारो वर्षांची गुलामी नष्ट झाली. शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी जेव्हा महाराष्ट्रातील सर्व पंडीतांनी विरोध दर्शविला तेव्हा काशीवरुन गागाभट्ट यांना बोलावून ६ जून १६७४ ला शिवरायांचा राज्याभिषेक करुन घेतला. स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे बघून ती माऊली धन्य धन्य झाली. स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडवून राजमाता रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला १७ जून १६७४ ला निसर्गचक्रात विलिन झाल्या.


जिजाऊ एक मुलगी, पत्नी, सून ,आई अशा सर्व अंगांनी त्यांचे व्यक्तिमत्व परीपूर्ण होते. त्यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक काळासाठी दिशादर्शक आहे. स्त्रियांनी व्रत,वैकल्ये,पोथी,पुराणे यात न अडकता जिजाऊ चरीत्र समजून घेतले पाहिजे. गड, किल्ले यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मुलांना ते आवर्जून दाखवायला हवेत. समाजातील निरक्षर,अबला स्त्रियांसाठी आधार व्हायला हवे. एका सशक्त सःस्कारांची मुहूर्तवेढ जिजाऊंनी कठोर परिश्रमांनी रोवली आहे. ती विचारांची पताका सदोदित चिरंजीव ठेवण्याचा वसा प्रत्येक स्त्रीने घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीतील अडचणींचा मागोवा घेवून जिजाऊंच्या खर्‍या वारसदार म्हणून मिरवणार्‍या समस्त महिलांनी यानिमित्ताने एकत्र येवून अंगाअंगात स्फूर्ती देणार्‍या, रोमांच उभे करणार्‍या ‘जय जिजाऊ’ या रणधुमाळीसोबत एकत्र येवून  समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आश्‍वस्त होवू.
 
ज्योती थोटे-गुळवणे
९८५०२११९४३
        PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
टीआरपी घोटाळा, पार्थो दासगुप्ताने डिलीट केले एक हजार स्क
आंदोलनकर्त्यांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फड
लोकशाहीत अराजकतेला स्थान नाही म्हणणार्‍या आरएसएसने दे
लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार
शेतकर्‍यांना भडकवणारा दीप सिद्धू भाजपचा कार्यकर्ता
काही समाजकंटकांनी घुसखोरी केल्याने आंदोलन हिंसक बनले
१ फेब्रुवारीला बजेट सत्रादरम्यान संसदेच्या दिशेने कूच
दिल्ली हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा म्हणणार्‍या की राम मंदिरा
प्रजासत्ताक राज्यात प्रजेची सत्ता आहे का?
कृषी कायदे येण्याआधीच अदानींना कवडीमोल किमतीने गोदामवा
टीआरपी घोटाळ्याचा मुख्य आरोपी अर्णव गोस्वामी
१ फेब्रुवारीला शेतकर्‍यांचा पायी मोर्चा थेट संसदेवर धड
शेतकरी हिताची ग्वाही देणार्‍या राष्ट्रपती कोविंद यांनी
अजेंडा आधारित पत्रकारितेचा अतिरेक
शेतकरी आंदोलनाला हिंसक बनवले शासक वर्गाने?
भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा
बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी प्रधानमंत्र्यां
सीएए-एनआरसीचा उल्लेख टाळत अमित शहांकडून नागरिकांना गों
शेतकर्‍यांपाठोपाठ आता कामगार कायद्यांविरोधात दंड थोपट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper